नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनमुळे देशातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितले.
मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा कोरोनाबाबत भाष्य केले. यामध्ये त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या निर्णयाने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. पण असा निर्णय घेणं देशहितासाठी योग्य आहे त्यामुळे तुम्ही मला माफ कराल ही खात्री वाटते. गोरगरिब जनतेला वाटत आहे हा कसला पंतप्रधान आहे. लोकांना अडचणीत टाकलं. घरात बंद करुन ठेवलं आहे. मात्र भारताच्या १३० कोटी जनतेला वाचवण्यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागला याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी कोरोनाशी मुकाबला केलेले रामगप्पा तेज यांच्याशी बातचीत केली. रामगप्पा यांनी मोदींना सांगितले की, क्वारंटाईनला लोकांनी जेल समजू नये. त्यावेळी मोदींनी त्यांना सांगितले की, तुमचा कोरोनाशी लढा देण्याचा प्रवास ऑडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल करा. तसेच मोदींनी कोरोनाग्रस्त कुटुंबाशीही संवाद साधला. कोरोनाशी कशाप्रकारे लढा दिला हे कुटुंबाने मोदींना सांगितले त्यावर तुम्ही आसपासच्या परिसरात कोरोनाबाबत लोकांना घरामध्येच राहण्यासाठी जनजागृती करा असं आवाहन केले. यावेळी एका डॉक्टरांनी मोदींना सांगितले की, आम्हाला उपचारासाठी सरकारकडून योग्य साहित्य मिळत आहे. मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युमुळे रुग्ण भयभीत होत आहेत. तेव्हा आम्ही त्यांना समजावतो की तुम्हाला इतका भयंकर रोग झाला नाही. कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मन की बातमधील महत्त्वाचे मुद्दे
पुण्यातील डॉक्टर बोरसे यांच्याशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. डॉक्टरांनी लोकांना सांगितले वारंवार हात धुवायला हवेत. खोकताना रुमालाचा वापर करावा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वत:ला इतरांपासून विलग ठेवा. आपला देश कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास डॉक्टरांनी मोदींकडे व्यक्त केला.
क्वारंटाईन केलेल्या लोकांनी सोशल डीस्टेंसिंग ठेवावं. अशा लोकांना भेदभावाची वागणूक देऊ नका. ते लोक जबाबदारीने स्वत:ला विलग ठेवत आहेत. यावेळी सोशल डिस्टेंसिंग वाढवा पण इमोशनल डिस्टेसिंग कमी करा
संकटावेळी माणुसकी जपा, गरिबांना जेवण द्या. भारत हे सर्व करु शकतो कारण ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत.