मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सगळे एक आहोत, आपण सर्व मिळून एकत्रितपणे हा संघर्ष करत आहोत, यासाठी येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवा, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश पेटवू, असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यावरुन कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली. देशाला इतकंही मुर्खात काढू नका, अशा शब्दांत आव्हाड मोदींवर बरसले. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवक नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वागत केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच मोदींच्या आवाहनाबद्दल दोन वेगवेगळे विचार पुढे आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च रोजी देशवासियांना जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. तसेच, सायंकाळी ५ वाजता थाळी, टाळी वाजविण्याचंही म्हटलं होतं. देशवासियांनी मोदींच्या या आवाहनला उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मोदींनी देशवासियांकडे ९ मिनिटे मागितली आहेत. कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकच संकल्प घेऊन लढतेय हे सर्वांना कळेल असं नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या या आवाहनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुमत दिसत आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मोदींच्या आवाहनाचं स्वागत केलं असून देशातील एकतेचा संदेश देणारी एक वेगळीच सुरुवातही केली आहे. रोहित यांनी आपल्या ट्विटरवरील अकाउंटचा डीपी बदलला असून त्याजागी तिरंगा ध्वज ठेवला आहे. देशातून एकोप्याचा संदेश देत असल्याचं रोहित यांनी म्हटलंय. 'दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान @narendramodi जी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो', असे रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. तर आव्हाड यांनी मी दिवा लावणार नसल्याचे सांगितलंय.
'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असं भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा मी गरिबांना दान करेन, असं आव्हाड म्हणाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टाळी वाजविण्याच्या आवाहनाचे स्वत: शरद पवार यांनीही स्वागत केले होते. त्यांचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.