नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला असल्याने बहुतांश भागातील प्रवासी वाहतूक बंद आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे लाखो भारतीय विविध देशाच अडकून पडले आहेत. दरम्यान, आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने तयारी सुरू केली आहे. आखाती देशातील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नौदलाने कंबर कसली असून, यासाठी नौदलाने १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत.
याबाबत माहिती देताना नौदलाचे व्हाइस चीफ व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार यांनी सांगितले की, ‘आम्ही आखाती देशांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत. यामधील चार युद्धनौका पश्चिम कमांड, चार युद्धनौका ईस्टर्न कमांड आणि तीन युद्धनौका दक्षिण कमांडमध्ये आहेत.’
दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाचा फटका नौदलालाही बसला आहे. त्याबाबत माहिती देताना कुमार यांनी सांगितले की,’मुंबईतील आएएनएस आंग्रे येथील ३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पैकी १२ जणांना इलाजानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २६ जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र आमच्या कुठल्याही युद्धनौकेत किंवा पाणबुडीमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही.’
दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.