नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे. देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्णांचे निदान होत असून, तीन हजारांहून अधिक रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडूनही लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत.
लॉकडाऊनसारख्या उपायांवर चर्चा सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोलोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जाणार का, असा प्रश्न विचारला असता नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जर गरज भासली तर त्या पर्यायांवरही चर्चा होते. २९ एप्रिल रोजी राज्यांना सविस्तरपणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. त्यामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाची चेन तोडण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीसह सर्वप्रकारच्या निर्बंधांबाबत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, काल देशभरात कोरोनामुळे तब्बल तीन हजार ७८० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या २ लाख २६ हजार १८८ वर पोहोचली आहे. तर काल देशामध्ये ३ लाख ८२ हजार ३१५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून २ कोटी ६ लाख ६५ हजार १४८ वर पोहोचली आहे.
सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४ लाख ८७ हजार २२९ वर पोहोचली आहे. ही संख्या देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी १६.८७ टक्के एवढे आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही ८२.०३ टक्के आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ एवढी झाली आहे. तर देशातील मृत्युदर घटून १.०९ टक्के झाला आहे.