नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1251 वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये 24 तासांत तब्बल 227 रुग्ण आढळले आहेत. देशातील 1251 रुग्णांपैकी 101 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान एका जोडप्याने आपल्या मुलाचं नाव 'लॉकडाऊन' ठेवल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला लॉकडाऊन दरम्यान मुलगा झाला. म्हणून या जोडप्याने आपल्या मुलाचं नाव 'लॉकडाऊन' असं ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसला देशातून बाहेर घालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कोरोनाविरोधातील लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत. देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांनी जे अभियान सुरू केले आहे त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या मुलाचं नाव लॉकडाऊन ठेवलं आहे असं या जोडप्यानं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरियातील खुखुंदू गावचे रहिवासी असलेल्या पवनकुरा यांची पत्नी नीरजा गर्भवती होत्या. नीरजा यांनी 28 मार्चला गावातील सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये एका मुलाला जन्म दिला. याच दरम्यान देशात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकही लॉकडाऊनचं पालन करत आहेत. अशा परिस्थितीत या जोडप्याने आपल्या मुलाचं नाव लॉकडाऊन ठेवलं आहे.
आम्ही मुलाचं नाव लॉकडाऊन ठेवल्यावर गावातील काही जणांनी आमची टिंगल करायला सुरुवात केली. पण नंतर लोकांनी कौतुक केल्याची माहिती मुलाच्या आईने दिली. तर 'कोरोनाविरोधातील लढाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बारकाईने लक्ष देऊन आहेत. अशा परिस्थितीत जन्मलेला आमचा मुलगा मोदींच्या यशस्वी अभियानाचे प्रतिक आहे. हे अभियान यशस्वी करण्याचं आपल्या सर्वांचं उद्दिष्ट हवं' असं लॉकडाऊनच्या वडिलांनी म्हटलं आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus : अमेरिका, युरोप कोरोनसमोर हतबल, जगभरात कोरोनामुळे 42 हजार जण मृत्युमुखी
दिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी
Coronavirus: चिंताजनक! एकाच दिवशी राज्यात नवे ८२ रुग्ण वाढले; चार दिवसांत मुंबईत ५९ रूग्ण