Coronavirus New Guidlines India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरूवारी कोरोना महासाथीच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना (New Guidlines) जारी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयानं लहान मुलं आणि किशोरवयीन (१८ वर्षाखालील) मुलांसाठी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची शिफारस करण्यात येत नसल्याचं आरोग्यमंत्रालयानं स्पष्ट केलंय. याशिवाय ६-११ वयोगटातील मुलं पालकांच्या थेट देखरेखीखाली सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं मास्क वापरू शकतात, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची गंभीरता पाहताही १८ वर्षांखालील मुलांसाठी अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. जर स्टिरॉइड्स वापरल्या गेल्या असतील, तर ते १० ते १४ दिवसांत क्लिनिकल सुधारणेच्या आधारे त्याचे डोस कमी करत गेले पाहिजे, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
१२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना प्रौढांप्रमाणेच मास्क घालावं, असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडे, विशेषत: ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तज्ञांच्या गटाद्वारे मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन केलं गेलं. ओमायक्रॉन हा कमी गंभीर आहे हे इतर देशांचा उपलब्ध असलेल्या डेटावरून दिसतं. परंतु महासाथीच्या पार्श्वभूमीवर याकडे काळजीपूर्वक निरिक्षण करणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलंय.
मार्गदर्शक सूचनातील महत्त्वाच्या बाबी
- ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क अनिवार्य नाही.
- १२ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची मुलं प्रौढांप्रमाणेच मास्क वापरू शकतात.
- १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटिव्हायरल मोनोक्लोनरल अँटिबॉडीचा सल्ला देण्यात येत नाही.
- कोरोनाच्या माईल्ड केसेसमध्ये स्टेरॉईड्सचा वापर घातक आहे.
- कोरोनासाठी स्टेरॉईड्सचा वापर योग्य वेळी करणं आवश्यक आहे. योग्य डोस देणंही आवश्यत आहे.
- मुलांमध्ये कोणतीही लक्षणं नसली किंवा माईल्ड केस असल्यास त्यांना रुटीन चाईल्ड केअर मिळणं आवश्यक आहे. जर योग्य असेल तर लसही दिली गेली पाहिजे.
- मुलांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचं काऊन्सिलिंग केलं जावं. त्यांना मुलांची काळजी कशी घ्यावी आणि श्वसनासंबंधी समस्यांबद्दल माहिती दिली जावी.
- कोरोनाच्या उपचारादरम्यान जर कोणत्याही मुलाच्या शरीराच्या कोणत्याही भागात समस्या आली तर त्यावर योग्य उपचार दिले जावेत.