नवी दिल्ली – संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरस संकटाशी मुकाबला करत आहे. या संकटाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ज्यामुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सगळं ठप्प आहे. अशा कठीण परिस्थितीत गरिबांना जेवणही उपलब्ध होत नाही. या लोकांसाठी सरकारकडून विविध ठिकाणी कम्युनिटी किचन सुविधा सुरु केली आहे.
या संघर्षाच्या प्रसंगात रेल्वे देशभरात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लॉकडाऊन काळात भारतीय रेल्वेने नवा इतिहास रचला आहे. रेल्वेकडून लोकांपर्यंत आवश्यक खाद्यपुरवठा केला जात आहे. पंजाबच्या ढंढारीकला येथून न्यू जलपाइगुडी इथंपर्यंत रेल्वेने दोन इंजिन आणि दोन अतिरिक्त डब्ब्यांसह ८८ डब्ब्यांची अन्नपूर्णा मालगाडीने ४९ तास ५० मिनिटात १ हजार ६३४ किमी प्रवास करण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंद केला आहे. यापूर्वी हे अंतर कापण्यासाठी ९६ तास ते १०० तास लागत होते. पण प्रवासी वाहतूक बंद असल्याने मालगाड्यांसाठी रेल्वे वाहतूक क्लीअर मिळत आहे त्याचा लाभही घेतला जात आहे.
पण या मालगाडीने रेल्वेच्या इतिहासातील एक नवीन अध्याय लिहिला आहे. याच कारणास्तव रेल्वेने या गाडीला अन्नपूर्णा असं नाव दिले आहे. अन्नाने भरलेल्या अन्नपूर्णा ट्रेनने तातडीने देशातील दहा राज्यांमधील गरजू लोकांना अन्न पुरवले जात आहे. रेल्वेने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची वाहतूक केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 137 टक्के जास्त आहे.
लॉकडाऊनच्या या टप्प्यात रेल्वेने भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) सोबत १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत अन्नधान्याची वाहतूक सुरु केली आणि त्यांचे उत्पन्नही वाढवले. रेल्वेचे सुमारे 70 टक्के उत्पन्न या वाहतुकीतून मिळत आहे. यामुळे रेल्वेला झालेल्या तोट्याची नुकसान भरपाईही काही प्रमाणात मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोट्यवधी टन धान्य अनेक राज्यात पोहचवले गेले. जेणेकरून स्थानिक लोकांसह परप्रांतीय मजुरांनाही हे धान्य मिळू शकेल. रेल्वेच्या या प्रयत्नातून देशातील सुमारे ८० टक्के लोकांना फायदा होणार आहे.
एका रेल्वेमधून सुमारे पाच हजार टन धान्यपुरवठा केला जात आहे. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १ ते १४ एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेशात मागील वर्षी ०.३३ लाख टनांपेक्षा २.९७ लाख टन धान्य पुरवठा केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ७९२ टक्क्यांनी अधिक आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये १.३० लाख टन ते २.२८ लाख टन (७६% वाढ), आसाममध्ये ०.५३ लाख टन ते २.०७ लाख टन(२९१% वाढ) महाराष्ट्रात ०.८० लाख टन ते १.८५ लाख टन (१३५% वाढ), गुजरातमध्ये ०.४७ लाख टन ते १.५५ लाख टन (२३०% वाढ), कर्नाटक ०.८० लाख टन ते १.५५ लाख टन (९३% वाढ) अशाप्रकारे अन्य राज्यात १.९४ लाख टन ते २.३९ लाख टन अन्य धान्याचा पुरवठा केला आहे.