नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत महाराष्ट्र, राजस्थान, जम्मू-काश्मीर नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नॉर्थ-ईस्टमध्येही कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे. अरुणाचल प्रदेशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे.
राजस्थानमध्ये गुरुवारी ९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये जयपूरमधील रामगंजमध्ये ७, जोधपूरमध्ये १ आणि झुंझुनुमध्ये १ रुग्ण असल्याचे समोर आले आहे. झुंझुनुमधील कोरोना बाधित रुग्णाचे तबलिगी जमातशी कनेक्शन होते. विशेष म्हणजे रामगंजमध्ये एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. आतापर्यंत राजस्थानमध्ये कोरोना बाधितांची संख्या १२९ वर पोहोचली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आज कोरोनाचे सात नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा ६२ वर पोहोचला आहे. तर दोघांचा आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोकांना क्वारंटाइन केले आहे. याचबरोबर, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे तीन नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दोन पुण्याचे आणि एक बुलढाणा येथील आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३३८ पोहोचली आहे. तर ४१ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय, २४ हजारहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन केले आहे.