नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Coronavirus in India) देशातील काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. तर काही राज्यांमध्ये चिंता कायम आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची नवी नियमावली जारी झाली असून, आता एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची गरज नाही, असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. (no need for RT-PCR test to travel from one state to another)
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संबोधित करताना सांगितले की, कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांमध्ये राज्यवार घट दिसून येत आहे. २६ राज्यांमध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर सहा राज्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगाणा, चंदिगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार येछे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरात येथेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नियमावलीबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आता एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. तसेच कोरोनाचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जाणार असेल तर त्यालाही आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. म्हणजेच रुग्णालयातून डिस्चार्ज होण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसेल.
देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम चालवली जात आहे. मात्र सध्या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.