हिस्सार (हरियाणा) - कोरोना विषाणूच्या संसर्गाने गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनामुळे आरोग्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. याचदरम्यान, आणखी एका भयानक आजाराने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचे नाव बुवाइन कोरोना विषाणू असे आहे. या विषाणूचा एक व्हेरिएंट हरियाणातील हिस्सारमधील एका म्हैशीच्या रेडकूमध्ये दिसून आला आहे. लाला लजपत राय पशु चिकित्सा आणि पशू विज्ञान विद्यापीठाच्या अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी विभागाने हा बुवाइन कोरोना विषाणू शोधून काढला आहे. (A new variant of coronavirus has been found in the buffalo)
परीक्षणासाठी संपूर्ण हरियाणामधून रेडकूंचे २५० हून अधिक नमुने घेण्यात आले होते. त्यामधील अनेक नमुने पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याच पॉझिटिव्ह नमुन्यांमधील अधिक संशोधनासाठी पाच नमुन्यांची सिक्वेंसिंग करण्यात आली. त्यामधून वरील धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशोधकांनी या संशोधनामधून बुवाइन कोरोना विषाणू हा वेगवेगळ्या जनावरांना बाधित करू शकतो का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या विषाणूबाबत विद्यापीठाच्या संशोधक डॉ. मीनाक्षी म्हणाल्या की, येत्या दहा वर्षांमध्ये माणसांमध्ये ज्या साथी येणार आहेत, त्या जनावरांच्या माध्यमातूनच येण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू उपस्थित आहेत. तसेच म्युटेशननंतर ते नवे रूप घेऊ शकतात. मात्र हे विषाणू कुठल्या प्रजातीमध्ये जात आहेत, ते अन्य प्राण्यांमध्ये पसरत आहेत का? हे जाणून घेणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, बुवाईन कोरोना विषाणू हा प्राण्यांचे मलमूत्र, दूध किंवा मांसाच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचू शकतो. संशोधनातील माहितीनुसार हा विषाणू सर्वप्रथम उंटामध्ये आला होता. विषाणूचे हे रूप म्युटेंट होत राहते. त्यामुळे ते मोठ्या जनावरांमधून माणसांमध्येही जाऊ शकते.
चिंताजनक बाब म्हणजे जर हा विषाणू म्युटेंट होऊन प्राण्यांमधून माणसांमध्ये पोहोचला तर खूप नुकसान करू शकतो. डॉ. मीनाक्षी यांच्या म्हणण्यानुसार SARS Covid-2 विषाणूमुळे माणसांमध्ये सुरुवातीला जुलाबांची समस्या जाणवली होती. त्याच आधारावर संशोधक या विषाणूवरील उपचारांसाठीही नॅनो फॉर्म्युलेशनच्या माध्यमातून मार्ग शोधत आहेत. आम्हाला यातून सकारात्मक परिणाम मिळत आहेत, असे संशोधकांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बुवाइनमुळे बाधित प्राण्यांना सुरुवातीला जुलाब होतात. तसेच डायरियाही होऊ शकतो. अधिक प्रमाणावर संसर्ग झाल्यास मृत्यूही होऊ शकतो. एवढेच नाही तर हा आजार छोट्या वासरांमधून मोठ्या प्राण्यांमध्येही पसरू शकतो. जनावरांचे मलमुत्र, दूध, मांस या माध्यमातून हा विषाणू माणसांपर्यंत पोहोचू शकतो. डॉ. मीनाक्षी यांच्या म्हणण्यानुसार विषाणूमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी लसीची गरज आहे.भविष्यात या विषाणूबाबतही लस तयार करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की शेतकरी आणि पशुपालकांनी एखादा प्राणी आजारी असल्यास त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे ठेवले पाहिजे.