नवी दिल्ली - जगातील काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार कोरोनापासून बचावासाठी देशातील प्रौढ लोकसंख्येला कोरोनावरील लसीचा बुस्टर डोस देण्याचा विचार करत आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने सोमवारी याबाबत निकटच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कोरोनाचा बुस्टर डोस हा मोफत असेल की त्याला काही शुल्क आकारले जाईल, हे मात्र सरकारने अद्याप ठरवलेले नाही.
जागतिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच कोविड-१९ च्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. सध्या चीन आणि युरोपसह दक्षिण-पूर्व आशियामधील देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, कोरोनाच्या बुस्टर डोससाठी भारतात सध्यातरी फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी मान्यता दिली आहे. सरकारने हा निर्णय अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर घेतला आहे. भारतामध्ये सोमवारी कोरोनाचे १५४९ रुग्ण सापडले होते. तर जगभरातील काही देशांमध्ये मात्र कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.
त्याशिवाय आतापर्यंत भारतामध्ये कोरोनाच्या लसीचे १८०.८० कोटी डोस वितरित झाले आहेत. भारताप्रमाणेच अमेरिका आणि युरोपमध्येही नागरिकांना कोरोनाच्या लसीचे बुस्टर डोस देण्याची तयारी सुरू आहे.
सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब-व्हेरिएंट असलेल्या बीए.२मुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी हा सब-व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. मात्र तो अधिक गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भारतातही अनेक तज्ज्ञांकडून कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.