कोची : आखाती देशांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी केरळमधून १०५ जणांचे वैद्यकीय पथक नुकतेच रवाना झाले. केरळमधील काही लाख लोक आखाती देशांमध्ये नोकरी व्यवसायासाठी गेले आहेत. तो ऋणानुबंधही लक्षात ठेवून ही मदत पाठविण्यात आली आहे. तिथे केरळमधून गेल्या काही दिवसांत पाठविण्यात आलेले हे दुसरे मोठे वैद्यकीय पथक आहे.केरळमधील सर्व जिल्ह्यांतल्या प्रतिनिधींचा समावेश असलेले हे वैद्यकीय पथक अबुधाबी येथे बुधवारी पोहोचले असून, त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील व्हीपीएस हेल्थकेअर या कंपनीने या कामी पुढाकार घेतला आहे. या पथकातील डॉक्टर व अन्य कर्मचारी संयुक्त अरब अमिरातीतील विविध रुग्णालयांतल्या कोरोना रुग्णांवर उपचार करतील. या वैद्यकीय पथकाला पाठविण्यासाठी परराष्ट्र खाते, गृह खाते, आरोग्य खात्यानेही तातडीने परवानगी दिली.या १०५ जणांच्या पथकामध्ये ७५ जण भारतातील डॉक्टर, नर्सेस आहेत तर बाकीचे ३० जण व्हीपीएस हेल्थकेअरचे कर्मचारी असून, ते सुटी घेऊन केरळमध्ये आले होते. लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले होते. या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना केरळमधून मोठे वैद्यकीय मदतपथक घेऊन येण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले, अशी माहिती या कंपनीचे संचालक (भारत विभाग) हाफिज अली उल्लत यांनी दिली.व्हीपीएस हेल्थकेअर कंपनीने म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात आखाती देशांमध्ये उपचारांसाठी आणखी डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. ही गरज ओळखून भारत, संयुक्त अरब अमिराती,केरळ सरकारने आमच्याप्रयत्नांना पाठबळ दिले. त्यामुळेच इतके मोठे वैद्यकीय पथक केरळमधून संयुक्त अरब अमिरातीला पाठविता येणे शक्य झाले.
CoronaVirus News : केरळमधून १०५ जणांचे वैद्यकीय पथक यूएईला; विविध रुग्णालयांत सेवा बजावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 1:14 AM