नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचे १९ नवे प्रकार सापडले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातही असे विषाणू आढळल्याचे विषाणू तज्ज्ञांनी सांगितले.आंध्र प्रदेशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूला एन४४० के असे नाव देण्यात आले आहे. या विषाणूमुळे त्या राज्यात संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढले आहे.
कोरोनातून बरे झालेल्या नॉयडातील एका व्यक्तीला नवीन विषाणूमुळे पुन्हा या संसर्गाची बाधा झाल्याचा प्रकारही उजेडात आला आहे. सीएसआयआरच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, नवा विषाणू शोधण्यासाठी विषाणू तज्ज्ञांच्या एका पथकाने देशभरात ६,३७० रुग्णांतील कोरोना विषाणूची गुणसूत्रे तपासली. त्यातील २० टक्के रुग्णांमध्ये नव्या विषाणूचे अस्तित्व आढळून आले.
हा नवा विषाणू आशियातून जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये पसरला आहे. देशभरातील सर्व कोरोना रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांच्या शरीरातील कोरोना विषाणूंचे जिनोम सिक्वेन्सिग करण्यात यावे अशी सूचना कोरोना साथ रोखण्यासंदर्भातील कृती दलाने केली आहे. ब्रिटनच्या तुलनेत भारताने फारसे जीन मॅपिंग केलेले नाही.