नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना विषाणू स्वत:च्या रुपात बदलत असताना कोरोनाची लक्षणंदेखील बदलू लागली आहेत. कोरोनाची नवी लक्षणं समोर येऊ लागली आहेत. दिल्लीत पाच कोरोना रुग्णांमध्ये गंभीर लक्षण आढळून आलं आहे.
देशात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांना साइटोमेगॅलोवायरसचा (Cytomegalovirus-CVM) त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. साइटोमेगॅलोवायरसचा त्रास सुरू झाल्यावर विष्ठेसोबत रक्त पडू लागतं. आतापर्यंत ५ रुग्णांमध्ये हे लक्षण आढळून आलं आहे. 'हे रुग्ण पोटदुखी आणि विष्ठेसोबत रक्त पडत असल्याची समस्या असल्यानं रुग्णालयात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर २० ते ३० दिवसांनंतर त्यांना हा त्रास सुरू झाला,' अशी माहिती दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयाचे डॉ. अनिल अरोरा यांनी दिली.
देशात डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता साइटोमेगॅलोवायरसमुळे चिंता वाढली आहे. सध्या देशात डेल्टा प्लसचे ४८ रुग्ण आहेत. यापैकी २१ रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी येईल हे आता निश्चित सांगता येणार नाही, असं कालच कोरोना टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं. 'कोरोना विषाणूचं बदलतं स्वरुप पुढील लाटेचा निश्चित कालावधी सांगता येऊ शकत नाही. कोरोना संकट रोखण्यासाठी प्रभावी पावलं उचलणं आपल्या हातात आहे,' असं पॉल यांनी सांगितलं.