नवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होत असतानाच, ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूच्या या नवीन प्रकाराने आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली असून, भारतातही कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळले आहेत. या सहाही जणांना अलगीकरणात ठेवले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.
या सहा जणांचे स्वॅब बंगळुरू, हैदराबाद व पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात बंगळुरूमध्ये तीन, हैदराबादमध्ये दोन, तर पुण्याच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत एक नवा स्ट्रेन आढळला. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानसेवा थांबविली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनाने भारतात पाऊल ठेवले आहे. २५ डिसेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
कोरोनाच्या नवसंकरित विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर घातलेल्या बंदीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी तसे संकेत दिले. ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना २२ डिसेंबरपासून भारतात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी ही प्रवेशबंदी संपत आहे. त्यानंतरही बंदी कायम ठेवावी किंवा कसे याचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. तूर्तास तरी बंदी वाढवावी लागेल, असे दिसत असल्याचे पुरी यांनी सांगितले.
नव्या विषाणूवरही लस परिणामकारक
ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा जो नवसंकरित विषाणू निर्माण झाला आहे त्यावर सद्य:स्थितीतील लस परिणामकारक ठरत आहे. या लसीला नव्या विषाणूने जुमानले नसल्याचे कोणतेही पुरावे सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे नव्या विषाणूपासून कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा केंद्र सरकारने दिला आहे. आरोग्य मंत्रालयातर्फे मंगळवारी यासंदर्भात सविस्तर विवेचन करण्यात आले.