हरीश गुप्ता नवी दिल्ली : एका दिवसात विक्रमी दोन लाखांवर कोरोना चाचण्या भारताने केल्या आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत भारताने एका दिवसात तब्बल २.१५ लाख चाचण्या केल्या आहेत. याबरोबरच भारताने आजवर केलेल्या चाचण्यांची संख्या जी ७३.५२ लाख होती ती बुधवारी रात्रीपर्यंत ७५ लाखांच्या पुढे गेलेली असेल. भारतात तीन प्रकारच्या कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्याही १,००० वर गेलेली आहे. यात ७३० सरकारी व २३० खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.तथापि, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, आता ती ४.५६ लाखांवर गेली आहे. १ जून २०२० रोजी भारतातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १.९० लाख होती; परंतु ती केवळ २४ दिवसांत दुप्पट झाली आहे. या कालावधीत चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाणही ४.९६ टक्क्यांवरून वाढले असून, ते ६.२ टक्के झाले आहे.पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण महाराष्टÑ, दिल्लीनंतर तेलंगणामध्ये सर्वांत जास्त आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ९.४४ लाख चाचण्या झाल्या असल्या तरी महाराष्टÑ (१७.७ टक्के) व दिल्लीमध्ये (१६.६ टक्के) रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्तआहे.१५ जून रोजी महाराष्टÑात ६.५९ लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५.९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याचप्रमाणे १० दिवसांच्या आत हा दर २ टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे १५ जून रोजी दिल्लीतील पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण १४.२ टक्के होते; परंतु ते २.४ टक्क्यांनी वाढले. हे सर्वाधिक होते.
CoronaVirus News : भारतात झाल्या कोरोनाच्या ७५ लाख चाचण्या, महाराष्ट्र, दिल्लीनंतर तेलंगणाचा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:58 AM