नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ७९२ रुग्णांची भर पडली असून, कोरोनाचा प्रवेश झाल्यापासूनची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर दिल्लीत रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे आणि आता दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांवर गेली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीकरांनी काळजी करू नये, असे आवाहन केले होते. रुग्ण वाढत असले तरी ते बरेदेखील होत आहेत. तसेच दिल्लीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले; परंतु गेल्या २४ तासांत तब्बल ७९२ रुग्ण वाढल्यामुळे दिल्लीकरांमध्ये धास्ती भरली आहे, हे नक्की. १८ मेपासून रोज ५०० किंवा ६०० च्या वर रुग्णांची नोंद होत आहे. बुधवारी त्याने सर्वोच्च बिंदू गाठला. आठशेच्या आसपास रुग्ण वाढल्यामुळे गुरुवारी २४ तासांत हजार रुग्णांची नोंद झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. आता दिल्लीमध्ये एकूण संख्या १५ हजार गेली आहे.