नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 9996 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 357 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 579 वर पोहोचली आहे.
देशात आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 41 हजार 029 झाली आहे. सध्या देशात 1 लाख 37 हजार 448 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत 8 हजार 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 51 हजार 808 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत 52 लाख 13 हजार 140 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल कोरोनाचे 3 हजार 254 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 94 हजार 41 झाला आहे. काल दिवसभरात 149 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 3 हजार 438 वर पोहोचला आहे. मात्र, मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे आज 1879 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 44 हजार 517 झाली आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे 46 हजार 74 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील पोलिसांसाठी नियंत्रण कक्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील 20 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 21, पुणे 2, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, एटीएस 1, मुंबई रेल्वे 1, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1 अशा 34 पोलीसवीरांना जीव गमवावा लागला. पोलिसांना काही लक्षणे दिसून आली, तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 190 पोलीस अधिकारी व 1269 पोलीस कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.