पुणे : सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने विविध लसी विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अॅस्ट्राजेनिका, मॉर्डना आणि फायझर या कंपन्यांच्या लसींच्या मानवी चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. कोणती लस सर्वात आधी उपलब्ध होणार, याची उत्सुकता असतानाच आता लसीकरणाबाबत अप्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. मॉर्डना आणि फायझर या कंपन्यांनी लसीच्या परिणामकारकतेचे अंदाज नुकतेच जाहीर केले आहेत. यानंतर अदार पुनावाला यांनी चांगल्या लसीच्या निकषांबाबत केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरले आहे.
सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला यांनी म्हटले आहे की, सुरक्षितता, संबंधित आजारापासून दीर्घकाळ संरक्षण, वाहतूक आणि योग्य तापमानात साठवणूक करण्याची क्षमता, संपूर्ण मानवजातीला परवडेल अशा दरात उपलब्धता हे चार चांगल्या लसीचे निकष आहेत. चांगल्या लसीचे चार महत्वाचे निकष कोणते याबाबत त्यांनी ट्विटरवर भाष्य केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट अॅस्ट्राझेनिका कंपनीसह कोव्हिशिल्ड लसीवर काम करत आहे. दुसरीकडे, जर्मन कंपनी बायोनटेक आणि अमेरिकन कंपनी फायझर संयुक्तरित्या लसीवर काम करत आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनंतर लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे चार दिवसांपूर्वी जाहीर केले. मॉर्डना कंपनीनेही त्यांची लस ९४.५ टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले आहे. या लसी सध्या नियामक मंडळाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी एकाही लसीला अजून पूर्णपणे व्यापक प्रमाणात वापरण्याची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मान्यतेच्या सर्व कसोट्या पार करुन कोणती लस सर्वप्रथम जास्तीत जास्त प्रमाणात आणि परवडणा-या दरात उपलब्ध होईल, याबाबत वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांनाच उत्सुकता आहे.