नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेला लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त ३० टक्के विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, प्रवासी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटकोर पालन करण्यावर भर देण्यात येईल. त्यानुसार एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत.पहिल्या टप्प्यात देशातील महत्त्वाच्या शहरांतून विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल. त्यामध्ये विविध राज्यांतील राजधानीची शहरे व महानगरे यांचा समावेश असेल. कोरोना साथीच्या सावटामुळे केंद्र सरकारने २२ मार्चपासून देशांतर्गत व २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केली होती. देशव्यापी लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपणार असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊन कधी मागे घेतला जाईल व विमानसेवा पुन्हा कधी सुरू होते याकडे असंख्य लोकांचे लक्ष लागलेले आहे. एएआयने मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, एखाद्या विमानतळावर अनेक टर्मिनल असतील तर सध्याच्या काळात फक्त एकाच टर्मिनलचा वापर करणे योग्य ठरेल. विमानतळावर सामान वाहून नेणारे अनेक स्वयंचलित पट्टे असतील तर त्यांच्यापैकी काहींचाच आळीपाळीने वापर व्हावा. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यास मदत होईल.लॉकडाऊन हटविल्यानंतर विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही काळ जावा लागेल. तोपर्यंत प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विमानतळावरील स्टॉलवर मर्यादित प्रमाणातच खाद्यपदार्थ ठेवावेत. सार्वजनिक वाहतूक सेवा, खासगी वाहतूक सेवा नीट सुरू असल्यास प्रवासी, कर्मचाऱ्यांना विमानतळावर पोहोचणे सुलभ होईल. त्याची विमानतळ प्रशासनाने वेळोवेळी खात्री करून घ्यावी.>खासगी कंपन्याही घेणार काळजीदेशभरातील १०० विमानतळांच्या देखभालीची व्यवस्था एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे आहे. मात्र दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या शहरांतील विमानतळांची व्यवस्था खाजगी कंपन्यांकडे आहे. दिल्ली व मुंबई विमानतळाची देखभाल करणाºया अनुक्रमे जीएमआर ग्रुुपची डीआयएएल कंपनी व जीव्हीके ग्रुपच्या एमआयएएल कंपनीने म्हटले आहे की, विमानतळावर रांगेमध्ये दोन प्रवाशांमध्ये दीड मीटरचे अंतर ठेवले जाईल. विमानतळावर तात्पुरते क्वारंटाइन केंद्र उभारण्यात येईल.
CoronaVirus News: लॉकडाऊननंतर ३० टक्केच विमानसेवा सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 3:47 AM