- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या उद्रेकामध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटरच्या नावाखाली आर्टिफिशिअल मॅन्युअल ब्रिथिंग युनिट (एएमबीयू) लावण्यात येऊन लोकांच्या जिवाशी खेळ करण्यात आला. हा मुद्दा आता चांगलाच तापत असून, त्यामुळे गुजरात मॉडेलवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमत चावडा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या गुजरात मॉडेलला विकासाचे अग्रणी म्हणून सांगत होते, त्याचे पितळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे वास्तव म्हणजे पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळताना त्यांना काहीही वाटत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, धामन-१ मशीनच्या वापरामुळे गुजरातमध्ये कोरोनाच्या मृतांची संख्या वाढली.काँग्रेसने आता या बनावट मशीनचा पर्दाफाश करण्यासाठी गुजरात मॉडेलचे एकेक पदर उलगडून दाखविण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे गुजरातमधील नेते व माजी खासदार राजू परमार म्हणाले की, गुजरातमधील कोरोनामुळे होणाºया मृतांची वास्तविक संख्या रूपानी सरकार हे केंद्राच्या इशाºयावरून जाहीर होऊ देत नाही. एवढेच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाºयावर एम्सचे संचालक गुलेरिया येथे येतात व राज्य प्रशासन रुग्णांची तब्येत योग्य असल्याचे सांगून सुटी देते. हे केवळ संख्या कमी दाखविण्यासाठी चालले आहे. सत्य लपवा, हेच खरे गुजरात मॉडेल आहे.
काँग्रेसने आज राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करून भाजप सरकारवर थेट हल्लाबोल केला. व्हेंटिलेटरच्या नावाखाली एएमबीयू मशीन का खरेदी केल्या, असा सवाल पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारची कंपनी एच.एच.एल. लाईफ केअरने विनातपासणी व विनाचाचणी ५ हजार मशीनची कशी आॅर्डर दिली? गुजरात सरकारचे आकडे सांगतात की, २५ व १८ मार्च रोजी सार्वजनिक रुग्णालयातून ३३८ रुग्ण बरे होतात व ३४३ जणांचा मृत्यू होतो. व्हेंटिलेटरच्या जागी या लोकांना एएमबीयू मशीन लावल्याचा हा परिणाम होता.
आता काँग्रेसचा सवाल आहे की, मुख्यमंत्री रूपानी व पराक्रमसिंह जडेजा यांच्यात काय संबंध आहेत? सरकार व त्यांचे अधिकारी ज्योती सीएनसी कंपनीचा बचाव का करीत आहेत? याच कंपनीने एएमबीयू मशीनचा पुरवठा केला होता.
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या बाबतीत आर्थिक घडामोडींचे शहर मुंबई आणि राजकीय राजधानी दिल्लीत सर्वाधिक रुग्ण असतील मात्र, तरीही अहमदाबादमध्ये कोरोना अधिक जीवघेणा ठरला आहे. या दोन्ही महानगरांच्या तुलनेत कमी रुग्ण असूनही अहमदाबादेत अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादेत मुंबईच्या तुलनेत दुप्पट तर, दिल्लीच्या तुलनेत जवळपास तिप्पट लोकांनी आपला जीव गमावला आहे.
याचे उत्तर दिलेच पाहिजे
अहमदाबाद सार्वजनिक रुग्णालयाच्या अधीक्षकांनी बजावून सांगितले होते की, या मशीन रुग्णांसाठी योग्य नाहीत. त्यांना व्हेंटिलेटर पाहिजेत; परंतु गुजरात मॉडेलच्या तंत्राने एएमबीयू मशीनचा वापर करण्यास सांगण्यात आले. आता हा मुद्दा खूपच तापला असून, एफआयआर दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसने सवाल केला आहे की, विरानी परिवार व मोदी यांच्यात काय संबंध आहेत? ज्या कंपनीने बनावट व्हेंटिलेटरचा पुरवठा केला, त्या कंपनीचे शेअर होल्डर रमेश भाई विरानी आहेत का, असा सवालही काँग्रेसने केला आहे.