नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर एअर इंडियाचे मुख्यालय सील करण्यात आले आहे. तसेच, मुख्यालयाचा परिसर सॅनिटाइज सुद्धा केला आहे.
एकीकडे, विमान सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीस्थित एअर इंडियाच्या मुख्यालयाशी संबंधित कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील एअर इंडियाची इमारत सील करण्यात आली आहे. 54 वर्षीय कोरोना बाधित कर्मचारी हे दिल्लीतील करोल बाग भागात राहतात. ते काही दिवसांपासून आजारी होते, त्यानंतर त्यांनी होम क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना टेस्ट झाल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले.
दरम्यान, गेल्या रविवारी एअर इंडियाचे पाच पायलट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. हे पाचही पायलट मुंबईत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेट करण्यात आले आहे. तसेच, एअर इंडियाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पायलट कार्गो विमान घेऊन काही दिवसांपूर्वी चीनला गेले होते.
विमान सेवा सुरू होणार? एजन्सींच्या पथकाची दिल्ली विमानतळाला भेट!देशात आजपासून काही पॅसेंजर ट्रेन सुरू झाल्या आहेत. आता प्रवाशांसाठी विमान सेवा सुद्धा सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डीजीसीए, ब्युरो ऑफ नागरी उड्डयन सुरक्षा कार्यालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि सीआयएसएफ यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी दिल्ली विमानतळाला भेट दिली आणि विमान सेवा पुन्हा सुरु करण्याच्या तयारीची सविस्तर माहिती दिली.
DAILच्या अहवालानुसार, दिल्ली विमानतळावर आर्ट सुविधा सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे सर्व ट्रॉली व ट्रे विषाणूमुक्त होईल. प्रवाशांच्या बॅग्ज व्हायरसमुक्त करण्यासाठी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर DIALने एक यूव्ही टनेल देखील तयार केला आहे. यूव्ही स्कॅनिंग प्रक्रिया आणि बॅगच्या रिक्मेलचे थेट सीसीटीव्ही फीड उपलब्ध होतील. याशिवाय, दिल्ली विमानतळावर मोबाइल निर्जंतुक टॉवर्सही तयार करण्यात आले आहेत. तसेच, 336 स्वयंचलित हँड सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन्स बसवण्याची प्रक्रियाही टप्प्या-टप्प्याने सुरू झाली आहे. विमानतळावरील प्रवाशांचे वॉशरूम, टर्मिनल इमारत आणि टच पॉईंट्स नियमितपणे स्वच्छ करण्याचे कामही सुरू झाले आहे.