नवी दिल्ली : देशातील ६० वर्षांवरील सर्वांना तसेच ४५ पेक्षा अधिक वय पण व्याधी असलेल्यांना १ मार्चपासून कोरोनावरील लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यासाठी देशात ३० हजार केंद्रे असतील. त्यापैकी १० हजार सरकारी केंद्रांत मोफत लस दिली जाणार असून, खासगी केंद्रे व रुग्णालयांत या लसीसाठी ठरावीक शुल्क आकारले जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. लसीकरणाच्या या टप्प्यात साधारणपणे २७ कोटी लोेकांना लस देण्याचे ठरले आहे. त्यापैकी सुमारे १० कोटी लोक ६० वर्षे वयावरील आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धे अशा तीन कोटी लोकांना लस देण्याची मोहीम अद्यापसुरू आहे.
या राज्यांना विनंती
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगड या राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. पाचही राज्यांनी आरोग्य कर्मचारी व कोरोनायोद्ध्यांना जलदगतीने लसी द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे कमी कालावधीत लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होईल.
राज्यात एक हजाराहून अधिक केंद्रे
महाराष्ट्रात सुमारे १०३५ केंद्रे, रुग्णालये, दवाखाने येथे १ मार्चपासून लस दिली जाईल. यापैकी ५१७ सरकारी, तर उरलेली खासगी असतील. ही लसीकरण केंद्रे कोणती व कोठे आहेत, हे लवकरच ऑनलाइन कळू शकेल. ज्या ज्येष्ठांना व अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस घ्यायची असेल, त्यांनी ऑनलाइनच अर्ज करायचा आहे. त्यानंतर त्यांना कोणत्या केंद्रावर, किती वाजता जायचे, याचा मेसेज मोबाइलवर येईल. त्याचवेळी तिथे पोहोचणे अपेक्षित आहे. त्याआधी केंद्रापाशी कोणीही गर्दी करता कामा नये.