नवी दिल्ली : काेराेना विषाणूचा संसर्गाची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र, आता काेराेना रुग्ण तपासणीसाठी श्वानांचाही वापर करण्यात येणार आहे. त्यांच्या गंध घेण्याच्या अफाट क्षमतेमुळे आता वास घेऊन संबंधित व्यक्ती काेराेनाबाधित आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे.लष्कराच्या सेवेत असलेल्या श्वान पथकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. कॅस्पर आणि जया अशी या श्वानांची नावं आहेत. नोव्हेंबर २०२० पासून कॅस्पर आणि जया यांना चंडीगड आणि दिल्ली येथे तैनात असलेल्या सैनिकांमधील नमुने तपासण्यासाठी तैनात केले गेले. हे दोघे सैन्याचे 'तज्ञ' श्वान आहेत. कॅस्पर हा दोन वर्षांचा कॉकर स्पॅनिअल आणि जया ही एक वर्षाची चिप्पिपराय श्वान आहे. घाम आणि लघवीच्या नमुन्यांमधून ते कोरोना रुग्णांचा शोध घेणार आहे.
स्फाेटके आणि अमली पदार्थांचा वास घेऊन शाेध लावणारे श्वान आता काेराेना रुग्णांचाही शाेध घेणार आहेत. लॅब्राडाॅर्स, स्वदेशी चिप्पीपराई आणि काॅकर स्पॅनियल्स या प्रजातीच्या श्वानांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिल्ली येथे लष्कराच्या पशुवैद्यक केंद्रात याचे प्रत्यक्ष नमुने घेऊन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील रिमाउंट व्हेटर्नरी काॅर्प्स सेटरमध्ये श्वानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.