नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका खरेदीमध्येच मोठा घोटाळा झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान सात लाख किंमतीची रुग्णवाहिका ही तब्बल 21 लाखांत खरेदी केल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या सिवान जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी रुग्णवाहिका सामान्य किंमतीपेक्षा तिप्पट पैसे देऊन खरेदी करण्यात आली. मात्र खळबळजनक बाब म्हणजे एवढी रक्कम देऊन खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचा आतापर्यंत एकदाही वापर करण्यात आलेला नाही. सिवानचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिकेची कमतरता निर्माण झाली होती. त्यावेळी ही खरेदी झाल्याचं म्हटलं जात आहे.
रुग्णवाहिकेची किंमत सात लाख सांगितली जात आहे. त्या रुग्णवाहिकेसाठी अपग्रेडेशनच्या नावाने 6 लाख 72 हजारांचं बिल पास करण्यात आलं. तसेच आरोग्य उपकरणाच्या नावाने जवळपास सहा लाख आणखी घेतले गेले, अशा प्रकारे सात लाखांची रुग्णवाहिका ही तब्बल 21 लाखांत खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या काही दिवसांत या रुग्णवाहिकेच्या घोटाळ्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रुग्णवाहिकेच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सूरु असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका रुग्णालयाने कोरोना रुग्णाला तब्बल 19 लाखांचं बिल दिलं आणि 8 लाख दिल्यानंतर देखील मृतदेह देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण बिल न दिल्यामुळे रुग्णाचा मृतदेह देणार नसल्याचं खासगी रुग्णालयाने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव येथील अनिल कुमार यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
लखनऊच्या टेंडर पाम रुग्णालयात अनिल यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर खासगी रुग्णालयाने तब्बल 19 लाखांचं बिल दिलं. अनिल यांनी आठ लाख रुपयांचं बिल भरलं. मात्र बाकीचं बिल अद्याप भरलेलं नाही. त्यामुळे रुग्णालयाने त्यांच्या पत्नीचा मृतदेह देण्यास नकार दिला आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मृतदेह मागितला असल्यास रुग्णालयाने माझ्याकडे आणखी 10.75 लाख मागितले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही अशी माहिती अनिल यांनी दिली आहे.