नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या तीन कोरोना प्रतिबंधक लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या लसी बनविणाऱ्या संस्था प्रत्येक लस किती रुपयांना उपलब्ध करून देणार याची विचारणा त्यांच्याकडे केंद्र सरकारने केली आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक व अहमदाबाद येथील झायडस कॅडिला या कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. आॅक्सफर्ड व अॅस्ट्राझेनिसा संयुक्तरीत्या विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी सांगितले की, तिन्ही कोरोना प्रतिबंधक लसींच्या चाचण्यांच्या प्रगतीवर केंद्र सरकारचे लक्ष आहे. लसी किती रुपयांना उपलब्ध होणार, हा मुद्दा आहे. त्यामुळे तशी विचारणा या लसींच्या निर्मात्यांना करण्यात आली आहे. लसींची किंमत लोकांना परवडणारी असावी, असा सरकारचा कटाक्ष आहे.>आॅस्ट्रेलियातील नागरिकांना लस मोफतकोरोना प्रतिबंधक लस तयार झाल्यानंतर आॅस्ट्रेलियातील प्रत्येक नागरिकाला ती मोफत दिली जाईल, असे त्या देशाने जाहीर केले आहे.आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने अॅस्ट्राझेनिसा कंपनी कोरोना प्रतिबंधक लस तयार करीत असून, आॅस्ट्रेलियाने या कंपनीशी लस मिळण्याबाबत करार केला आहे.आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात यश आल्यास तिचे आम्ही उत्पादन करणार आहोत. या लसीचे आॅस्ट्रेलियातील २.५ कोटी नागरिकांना वितरण करण्यात येईल. या देशात आतापर्यंत २३ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४३० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
CoronaVirus News: लसींच्या किमतीविषयी केंद्राची कंपन्यांकडे विचारणा, तीन लसींच्या चाचण्यांवर बारीक लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:48 AM