नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींच्यावर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांनी कोरोनाची लस घेतली असून काहींवर लसीचा साईडइफेक्ट पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू, नाणी चिकटत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगडमध्ये देखील लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे. राजनांदगाव (छत्तीसगड) महानगरपालिकेच्या नगरसेविका सुनीता फडणवीस (Sunita Fadnavis) यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती विकसित झाल्याचा दावा केला.
सुनीता फडणवीस यांच्या हाताला चमचे आणि नाणी चिटकलेली पाहायला मिळत आहेत. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ बीएल कुमरे यांनी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं म्हटलं आहे. सुनीता फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी त्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस मे मध्ये देण्यात आला. त्यानंतर पूजा कराताना त्यांच्या हाताला नाणी चिकटले. त्यानंतर त्यांनी मुलांकडे चमचा मागितला तर तो देखील त्यांच्या हाताला चिकटला. याचा व्हिडिओ बनवून सुनीता यांच्या पतीने डॉक्टरांना पाठविला. तर डॉक्टरांनी हे लसीमुळे झालं की नाही हे अद्याप सांगता येत नसल्याचं म्हटलं आहे.
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. बी. एल. कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या हाताला नाणी व स्टीलच्या वस्तू चिकटल्याचे पाहिले. मात्र ही नवीन गोष्ट नाही, खूप आधीपासून असे घडत आहे. शरीराची रचना त्वचेच्या रचनेवर अवलंबून असते. काही लोकांची त्वचा पूर्णपणे केसरहित असते, घामामुळे मिठाचे प्रमाण जास्त असते. शरीर लहान कणांपासून बनलेले असते, त्यात अर्धवट विद्युत चुंबकीय शक्ती देखील असते. त्याच बरोबर, कृत्रिम कपडे घालण्यामुळे घर्षण होते, ज्यामुळे त्वचेमध्ये चुंबकीय शक्ती तयार होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे परीणाम दुष्परिणाम या विषयी अनेक चर्चा असतानाच नाशिक शहरातील सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत. अरविंद सोनार यांनी 9 मार्च रोजी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर 2 जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता प्रतिपिंड तयार होणार अशी त्यांची भावना असताना भलताच प्रकार पुढे आला आहे. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री बघितले. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली. तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचे लक्षात आले.