नवी दिल्ली: देशामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ८३ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तर, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १० लाखांवर गेली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ सध्या या आजाराबाबत विविध माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, यासाठी रिसर्चही केले जात आहे. यातून विविध शोध लागत आहेत. अशाच एका रिसर्चमध्ये आता ५ वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचे समोर आले आहे.
तज्ज्ञांनी केलेल्या या रिसर्चनूसार, लहान मुलांमध्ये त्यांच्या श्वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रौढांपेक्षा व्हायरल लोड १० पट ते १०० पट जास्त आहे. कोरोना असणार्या मोठ्या मुलांमध्ये व्हायरल लोड प्रौढांमधील पातळीप्रमाणेच आहे. या अभ्यासामध्ये व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचे प्रमाण ५ वर्षांखालील मुलांमध्ये जास्त असल्याचे दिसून आले. या अभ्यासामध्ये केवळ व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचा अभ्यास करण्या आला. संसर्गजन्य व्हायरसचा नाही, म्हणजेच ही मुलं व्हायरसचा प्रसार करतात की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र ५ वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे. दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या.
कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेऊन, त्यांची चाचणी व उपचार करणे ही नीती अवलंबल्यामुळेच देशातील मृत्यूदर कमी असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता.
कोरोनाच्या १ कोटी ८१ लाखांहून अधिक चाचण्या
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या ४,४६,६४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या १,८१,९०,३८२ झाली.