नवी दिल्ली : वर्षभर छळणाऱ्या कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्र व राज्य यांच्यातील समन्वयाची चाचपणी म्हणून शनिवारी, २ जानेवारी रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन परिस्थितीतील वापरासाठी मंजुरीची मागणी होत आहे.
कुठे होणार?
- सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांत
- किमान तीन ठिकाणी होणार
- ज्या राज्यांमध्ये दुर्गम ठिकाणांचा समावेश आहे त्या जिल्ह्यांचाही या प्रक्रियेत समावेश
- महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांत राजधानीच्या शहरांव्यतिरिक्त अन्य मोठ्या शहरांतही रंगीत तालीम
मोहिमेचे उद्दिष्ट काय?
- को-विन ॲप्लिकेशनची सुसाध्यता तपासणे
- प्रत्यक्ष जमिनीवर मोहीम राबविताना काय अडचणी येतील ते पाहणे
- नियोजन आणि अंमलबजावणी यातील समन्वय पारखणे
- केंद्र व राज्यांमधील संपर्कयंत्रणांची चाचपणी करणे
या माेहिमेतून मिळेल यंत्रणेला आत्मविश्वास
लसीकरण मोहिमेसाठी घेण्यात येणाऱ्या रंगीत तालमीतून या सर्व मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पातळीवरील कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास मिळेल. तसेच प्रत्यक्ष मोहीम राबविताना काय अडचणी येऊ शकतात, याचाही अंदाज यातून येऊ शकेल. - केंद्रीय आरोग्य मंत्रालय.
८३ काेटी सिरिंज खरेदी करणार
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारने ८३ कोटी सिरिंज खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ३५ कोटी सिरिंजसाठी केंद्र सरकारने निविदाही मागविल्या आहेत.
चार जिल्ह्यांची निवड
कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालीमीसाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.