नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूवर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात सुमारे ११५ ठिकाणी संशोधन सुरू असून, त्यात भारतातील सात कंपन्या व विज्ञान संस्थांचा सहभाग आहे.
ज्या संशोधनासाठी कमाल पाच वर्षे लागू शकतात तेच संशोधन १८ ते २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे व जगाची कोरोनाच्या साथीपासून कायमची मुक्तता करण्याचे ध्येय शास्त्रज्ञांनी बाळगले आहे. कोएलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस एनोव्हेशन्स (सीईपीआय) या फाऊंडेशनने यासंदर्भात एक पाहणी केली. त्यातील निरीक्षणांत या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. कोरोनाची साथ पसरल्यानंतर तिच्यावर मात करण्याकरिता ज्या वेगाने व व्यापक प्रमाणात जगामध्ये संशोधन सुरू झाले ती अभूतपूर्व घटना होती.
कोविड-१९ या विषाणूचा जगभरात ५३ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून ३ लाख ४० हजारांपेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत. लस बनविण्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारी व काहीशी वेळखाऊ पद्धत कोरोना साथीच्या हाहाकारानंतर बाजूला ठेवण्यात आली. विविध देशांतील सरकारे, स्वयंसेवी संस्था व औषध कंपन्या यांनीदेखील कोविड-१९ या विषाणूवर लस शोधण्यासाठी परस्परांचे सहकार्य घेतले आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्यलर बायॉलॉजी (सीसीएमबी) या संस्थेचे संचालक राकेशकुमार यांनी सांगितले की, लस शोधून काढण्यासाठी भारतीय कंपन्यांनी संशोधनाच्या विविध पद्धती वापरल्या आहेत.
व्यावसायिक फायदाही होणार
पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसएसआय), अहमदाबाद येथील झायडस कॅडिला यासारख्या संस्था, कंपन्यांनी कोविड-१९ विषाणूवरील प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी सध्या प्रयोग सुरू ठेवले आहेत. भारतात अनेक लसींचे उत्पादन होऊन त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. कोविड-१९ वर भारत प्रतिबंधक लस तयार करू शकला तर त्याचा देशातील औषधनिर्मिती उद्योगाला व्यावसायिक फायदा मिळेल.