नवी दिल्ली: जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. चीन, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना परतला असल्यानं भारताची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. संबंधित विभागांनी सर्तकता राखावी आणि कोरोना चाचण्या वाढवाव्यात अशा स्वरुपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यानं ३१ मार्चपासून कोरोना निर्बंध हटवले जाणार आहेत. याबद्दलचा निर्णय गेल्याच आठवड्यात घेण्यात आला. मात्र आता यावरून सरकारनं भूमिका स्पष्ट केली आहे. निर्बंध हटवले याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही, असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे. लोकांनी मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
देशात कोरोनाची चौथी लाट ऑगस्टमध्ये येऊ शकेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ओमायक्रॉनच्या BA.2 सबव्हेरिएंटची संख्या हळूहळू वाढत चालली असल्याचं राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं (एनसीडीसी) सांगितलं. 'आधी BA.2 व्हेरिएंट कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यामागचं प्रमुख कारण होतं. मात्र आता BA.2 व्हेरिएंट हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे,' असं एनसीडीसीकडून सांगण्यात आलं आहे.