नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ८१ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे १,२१,६४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोनाचा वेग मंदवताना दिसत आहे. दिलासादायक माहिती मिळत असून कोरोनाचा सुखावणारा ग्राफ समोर आला आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाबाबत आता महत्त्वाची महिती समोर आली आहे.
सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा ग्राफ आता ५० टक्क्यांनी खाली घसरला आहे. रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या सात दिवसांची सरासरी पाहिली असता गुरुवारपर्यंत देशात ४७,२१६ रुग्ण दररोज आढळत होते. ही संख्या १७ सप्टेंबरच्या कोरोनाने रुग्ण संख्येच्या अर्धीच आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग तीव्र गतीने होत असताना गेल्या एका आठवड्यापासून ५० टक्के कमी रुग्णवाढ होत आहे.
ऑक्टोबरला मृत्यूची संख्या ५० टक्क्यांनी कमी
सात दिवसांच्या सरासरीचा ग्राफ वाढीच्या तुलनेत अधिक वेगाने खाली घसरलेला पाहायला आहे. १९ सप्टेंबरला कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असताना त्यावेळी जवळपास ११७६ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, २९ ऑक्टोबरला मृत्यूची संख्या ५० टक्क्यांनी कमी होऊन ५४३ इतकी झाली होती. गेल्या सात दिवसांची सरासरी २७ जुलैच्या संख्येच्या आसपास आहे. त्यावेळी रुग्णसंख्या ४६,७६० इतकी होती. यानंतर ५२ दिवसांमध्ये १७ सप्टेंबरला कोरोनाचे रुग्ण दुप्पट झाले. या संख्येत ५० टक्के घट येण्यासाठी ४२-४३ दिवसांचा कालावधी लागला.
कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के
दररोज होणाऱ्या मृत्यूमध्ये १५ जुलैच्या संख्येच्या बरोबरीची आहे. त्यावेळी दिवसाला सरासरी ५३८ मृत्यू होत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तिथे ९२ लाख १२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांहून कमी आहे.
देशात झाल्या १० कोटी ७७ लाख कोरोना चाचण्या
देशात १० कोटी ७७ लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाय योजना करण्यात येत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार २९ ऑक्टोबर रोजी ११,६४,६४८ कोरोना चाचण्या पार पडल्या. देशात आतापर्यंत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या १०,७७,२८,०८८ झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावरील ब्राझीलमध्ये ५४ लाख ९६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.