नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे विक्रमी ५,२४२ रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. याच काळात १५७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे तसेच रुग्णसंख्या लाखाच्या घरात पोहोचल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत.सोमवारी रात्रीच भारतातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. कारण सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्ण संख्या ९६,१६९ झाली होती आणि मृतांची संख्या तीन हजारांचा टप्पा ओलांडून गेली होती.17 मेपर्यंत देशात रोजची रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली असायची. मात्र एकाच दिवसात रुग्णांची संख्या पाच हजारांनी वाढली. देशातील ७२९ जिल्ह्यांपैकी ५५० जिल्ह्यांत कोरोनाने प्रवेश केला आहे. त्या आधी केवळ ४३० जिल्हेच कोरोनाबाधित जिल्हे होते.24 मार्चपासून ३१ मेपर्यंतचा ६९ दिवसांचा प्रदीर्घ लॉकडाऊन देशभर असून आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.कठोर पावले उचलल्यास रुग्णवाढीचा आलेख खाली येऊन16 मेनंतर तो स्थिर होईल, असे तज्ज्ञ मंडळींनी म्हटले होते. पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (आरोग्य) अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २४ एप्रिल रोजी देशासमोर सादर केलेल्या प्रेझेंटेशनने कोरोना रुग्णवाढीचा आलेख खाली येईल, अशी आशा निर्माण झाली होती. पॉल यांनी लॉकडाउनमुळे विषाणूला रोखण्यात मदत झाल्याचा दावाही केला होता. त्याचवेळी डॉ. पॉल यांनी१६ मेनंतर कोरोनाचा आलेख खाली येईल, असे भाकीत केले होते.जागतिक पातळीवर प्रति लाख ६० रुग्णभारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांचे प्रमाण ७.१ असून जागतिक पातळीवर मात्र प्रति लाख ६० आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण प्रति लाख ३६१, स्पेनमध्ये प्रति लाख ४९४, इटलीत ३७३ आणि ब्राझीलमध्ये प्रति लाख १०४ आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ३८.३९ टक्के आहे. भारतात आतापर्यंत व्यापक उपाययोजना करण्यात आल्याने समाधानकारक परिणाम मिळत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.११ टास्क फोर्सअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) डॉ. पॉल हे नामांकित डॉक्टर असून नीती आयोगाचे सदस्यही आहेत. लॉकडाऊनसह इतर उपाययोजना सुचवण्यासाठीच्या अनौपचारिक गटाच्या प्रमुखपदी मोदी यांनी डॉ. पॉल यांची १८ मार्च रोजी निवड केली होती. तेव्हा देशात कोरोनाचे रुग्ण ६०० व १६ मृत्यू होते. सहा एप्रिल रोजी मोदी यांनी पॉल यांना पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या (आरोग्य) अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्याआधी मोदी यांनी कोविड-१९ वर मंत्र्यांचा गट सहा फेब्रुवारी रोजी स्थापन केला. त्याचे प्रमुख होते केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन. नंतर मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जे विषय आहेत, त्याबाबत सल्ला घेण्यासाठी ११ टास्क फोर्सेसची स्थापना केली.26.47 लाख रुग्णांवर उपचार सुरूजगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ४८ लाख ४८ हजार झाली असली, तरी १८ लाख ७४ हजार रुग्ण बरे झाल्याने २६ लाख ४७ हजार जणांवर उपचार सुरू आहेत. जगभरात मृतांचा आकडा ३ लाख १७ हजार झाला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या ९१ हजारांवर गेली.या राज्यांनाही विळखा...देशातील अन्य राज्यांना कोरोनाने विळखा घातला असून महाराष्टÑानंतर तामिळनाडू, गुजरात, दिल्लीतील रुग्णांची संख्या10,000 वर गेली आहे. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, बिहारचा क्रमांक लागतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील स्थिती गंभीर बनली आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या ८ हजारांवर पोहोचली असून मृतांचा आकडा ५५५ झाला आहे.
CoronaVirus News : कोरोनाचे देशात १,००,००० रुग्ण; गेल्या २४ तासांत ५,२४२ जण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 5:46 AM