नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. खबरदारीच्या उपाययोजना करून योग्य ती काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी, नष्ट करण्यासाठी अजब-गजब उपाय हे केले जात आहेत. अशातच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना देवीचं मंदिर उभारण्यात आलं आहे. एवढंच नाही तर दर्शनासाठी लोक लांबच्या लांब रांगा लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या एका गावामध्ये ग्रामस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत वर्गणी काढून कोरोना मातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. रोज कोरोना मातेचा जयजयकार केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगडमधील एका गावात गावकऱ्यांनी झाडाखाली छोटंसं कोरोना मातेचं मंदिर (Pratapgarh Corona Mata Temple) तयार केलं आहे. त्यानंतर याची सर्वत्र चर्चा झाली आणि लोक मोठ्या संख्येने येथे येण्यास सुरुवात झाली. लोक येथे येऊन या देवीची पूजाही करत आहे. कोरोना मातेला नैवेद्य दाखवला जातो. शुक्लपूर गावात कडुलिंबाच्या झाडाखाली कोरोना मातेचं मंदिर आहे. या मंदिरात कोरोना माता म्हणून एका मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीला मास्क देखील घातलेला आहे. या मूर्तीच्या मागच्या भिंतीवर कोरोनाबाबतचे महत्त्वाचे उपाय दिलेले आहेत.
मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं लिहिण्यात आलं कोरोना मातेचं दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ देखील शिस्तीत कोरोनाचे सर्व नियम पाळूनच उभे राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींच्यावर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांनी कोरोनाची लस घेतली असून काहींवर लसीचा साईडइफेक्ट पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू, नाणी चिकटत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगडमध्ये देखील लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे.
बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण झाली चुंबकीय शक्ती; नगरसेविका फडणवीस यांचा दावा
राजनांदगाव (छत्तीसगड) महानगरपालिकेच्या नगरसेविका सुनीता फडणवीस (Sunita Fadnavis) यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती विकसित झाल्याचा दावा केला. सुनीता फडणवीस यांच्या हाताला चमचे आणि नाणी चिटकलेली पाहायला मिळत आहेत. लसीकरण अधिकारी डॉ बीएल कुमरे यांनी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे जिल्हा आहे. सुनीता फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी त्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस मे मध्ये देण्यात आला. त्यानंतर पूजा कराताना त्यांच्या हाताला नाणी चिकटले. त्यानंतर त्यांनी मुलांकडे चमचा मागितला तर तो देखील त्यांच्या हाताला चिकटला. याचा व्हिडिओ बनवून सुनीता यांच्या पतीने डॉक्टरांना पाठविला. तर डॉक्टरांनी हे लसीमुळे झालं की नाही हे अद्याप सांगता येत नसल्याचं म्हटलं आहे.