नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु काही राज्यांतील आकडेवारी पाहता तिथे गेल्या काही दिवसांत वाढीचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसत आहे. ही बाब दिलासादायक आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये सध्या ६ हजारांच्या आसपास बाधित आहेत. या ठिकाणी दररोज नवीन रुग्णांची भर पडत असली तरी वाढीचा दर देशातील सरासरी वाढीपेक्षा कमी झाला असल्याचे मागील दोन आठवड्यांत दिसून आले आहे.
मागील तीन आठवडे गुजरातमधील आकडेवारी सातत्याने ३00 ते ४00 या आकड्यांच्या दरम्यान वाढलेली दिसते. केवळ १६ मे रोजी हा आकडा १ हजाराने वाढला होता. कारण त्या दिवशी जोखमीच्या गटात मोडणाऱ्या वर्गामध्ये शिबिराद्वारे करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांतून समोर आलेल्या रुग्णांची संख्या समाविष्ट करण्यात आली होती. ती ७०० इतकी होती.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही गेले काही दिवस बाधितांचा आकडा दररोज सातत्याने १५0 ते ३00 ने याच प्रमाणात वाढलेला दिसत आहे. या तीन राज्यांमध्ये बाधितांचा वाढणाºया आकड्यांचा दर देशाच्या दरापेक्षा कमी झालेला दिसत आहे.
तीन राज्यांत वेगाने वाढ
देशातील एकूण बाधितांचा आकडा १.३ लाखांच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्ली या ३ राज्यांत दररोज आढळणाºया नवीन रुग्णांमुळे हा देशाचा आकडा वाढत चालला आहे.