नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ एका मुलावर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेजारी आणि नातेवाईकांनी मदतीस नकार दिल्यानंतर मुलावर ही वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी देखील महिलेच्या घरी आले नाहीत. महिलेच्या मुलाने गावकऱ्यांकडे मदत मागितली. मात्र त्यांनी नकार दिला. शेजाऱ्यांनी भीतीने दार-खिडक्या बंद करून घेतल्या. त्यामुळे शेवटी मुलाने आपल्या आईचा मृतदेह एका हातगाडीवर टाकून स्मशानभूमीत आणला आणि एकट्यानेच अंत्यसंस्कार केले आहेत.
55 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी तिला 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार महिला आपल्या घरी राहत होती. याच दरम्यान तिची प्रकृती अधिक बिघडली आणि तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या धास्तीने एका कुटुंबाने आपल्याच नातेवाईकाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तेलंगणात ही भयंकर घटना समोर आली आहे. कामारेड्डी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयातून मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर एका मुस्लिम तरुणाने या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. तेव्हा एका मुस्लिम तरुणाने त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.