CoronaVirus News : कोरोनाचे मृत्यू; मध्य प्रदेशात लपवालपवी?, भोपाळमध्ये होणारे अंत्यविधी आणि राज्याने दिलेल्या मृतांच्या संख्येत तफावत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:43 AM2021-04-15T06:43:32+5:302021-04-15T06:43:59+5:30
CoronaVirus News: भोपाळच्या एकट्या भदभदा स्मशानभूमीत सोमवारी कोरोनाने मरण पावलेल्यांचे एकूण ३७ मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते. परंतु त्या दिवशी राज्यात एकूण ३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली.
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू लक्षणीय आहेत. कोरोनाने मरण पावलेल्यांवर दहन आणि दफनविधी करण्यासाठी अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. अशातच राज्य सरकारकडून दिली जाणारी कोरोना मृतांची आकडेवारी आणि भोपाळमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या या रोगाने मरण पावलेल्यांच्या मृतदेहांची संख्या यात तफावत दिसून येत आहे. यामुळे सरकार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीत लपवालपवी करीत आहे, अशी शंका निर्माण झाली आहे.
भोपाळच्या एकट्या भदभदा स्मशानभूमीत सोमवारी कोरोनाने मरण पावलेल्यांचे एकूण ३७ मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते. परंतु त्या दिवशी राज्यात एकूण ३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली. मागील पाच दिवसांची आकडेवारी पाहता ही तफावत प्रकर्षाने समोर येते. (वृत्तसंस्था)
अंत्यविधीसाठी लाकूडफाट्याची चणचण
- भोपाळमधील अंत्यविधी केंद्रांवर काम करणारे कर्मचारी सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. अंत्यविधीसाठी सतत मृतदेह येत असल्याने त्यांना जेवण घेण्यासही वेळ मिळत नाही.
- काही ठिकाणी अंत्यविधीसाठी पुरेसा लाकूडफाटा नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.
- भोपाळमधील एका स्मशानभूमीचे कर्मचारी रईस खान म्हणाले की, आम्हाला सध्या आठवड्याला १०० ते १५० क्विंटल लाकूड लागत आहे. मागील आठवड्यात दररोज ४० ते ४५ मृतदेह येऊ लागल्याने हा लाकूडफाटा आम्हाला कमी पडू लागला आहे.
- कोरोनाने मरण पावलेल्यांची आकडेवारी कमी दाखवत असल्याचा आरोप सरकारने खोडून काढला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विश्वास सारंग म्हणाले की, कोरोनामुळे होत असलेले मृत्यू लपविण्याचा सरकारचा अजिबात हेतू नाही. असे केल्याने आम्हाला कुणी पुरस्कार देणार नाही.