नवी दिल्ली: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. देशात सध्या दररोज जवळपास ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तर जगात हाच आकडा साडे पाच लाख इतका आहे. जगभरात कोरोनामुळे दररोज साडे आठ हजार जणांना जीव गमवावा लागत आहे. एका बाजूला कोरोनाचं संकट कायम असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी, पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
देशातील जनतेनं पुढील एक ते दीड वर्ष सतर्क राहायला हवं आणि कोरोना विषाणूचा पुन्हा होणारा स्फोट टाळायला हवा, असं एम्सच्या औषध विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितलं. 'सणांचा उद्देश आनंद वाटणं असतो. कोरोना वाटणं नव्हे. त्यामुळे पुढील १- वर्षे, जोपर्यंत महामारी नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत आपण महामारी पसरवण्यामागचं कारण ठरायला नको,' असं निश्चल म्हणाले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढील १०० ते १२५ दिवस महत्त्वाचे असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर निश्चल यांचा इशारा महत्त्वाचा आहे.
देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही कोरोना संक्रमणाच्या दृष्टीनं संवेदनशील आहे. त्याचमुळे तिसऱ्या लाटेचा धोका वारंवार वर्तवला जातो, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दररोज ५ लाखांहून रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळेच चांगली परिस्थिती बिघडत असल्याचं निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेनं नोंदवलं आहे,' असं पॉल म्हणाले.