नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षांपासून देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र अद्यापही कोरोना संकट संपलेलं नाही. दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. लसीकरण मोहीम वेग धरत असतानाही तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा विषाणू स्वत:चं रुप बदलत असल्यानं, तो म्युटेट होत असल्यानं चिंतेत भर पडत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांना ताप, घश्यात खवखव आणि श्वास घेण्यास अडचण होते. मात्र आता कोरोनाची नवी लक्षणं समोर आली आहेत.
कोरोनाची नवी लक्षणं समोर आल्यानं चिंता आणखी वाढली आहे. कोरोना टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. राहुल पंडित यांनी कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती दिली आहे. 'ऐकू येण्यात अडचणी, अतिशय जास्त अशक्तपणा, तोंड सुकणं, तोंडात लाळ कमी तयार होणं, बराच वेळ राहणारी डोकेदुखी, त्वचेवर चकत्या तयार होणं, डोळे येणं ही कोरोनाची नवी लक्षणं आहेत,' असं पंडित यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वीच डॉ. राहुल पंडित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती देत सरकारला सतर्कतेचं आवाहन केलं होतं. 'कोरोना पसरुन बराच कालावधी झाला आहे. आता कोरोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे,' असं पंडित म्हणाले.
कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये बहिरेपणाची समस्या आलेल्यांची संख्या कमी असल्याचं आर. एन. कूपर रुग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. समीर भार्गव यांनी सांगितलं. 'नसांमध्ये सूज येत असल्यानं तयार होत असलेल्या गाठींमुळे ऐकण्यात काहीशा अडचणी येत आहेत. मात्र बहिरेपणाच्या समस्या कमी रुग्णांना जाणवत आहेत,' असं भार्गव म्हणाले.