नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,83,76,524 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,79,257 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3645 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,04,832 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान भाजपा आमदाराच्या लेकाचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. यामध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे.
मास्क न लावता आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन न करता सर्व नियम धाब्यावर बसवून भाजपा आमदाराच्या मुलाचा विवाहसोहळा पार पडल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या अररिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून आलं आहे. फारबिसगंज मतदारसंघाचे भाजपाचे आमदार विद्यासागर केसरी यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडालेला पाहायला मिळला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे काही व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
भाजपा आमदाराच्या लेकाच्या लग्नाला जिल्ह्यातील मोठे नते, व्हीआयपी मंडळीही उपस्थित होती. कोरोनाच्या संकटात नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना सत्ताधारी नेत्यांनीच असे बेजबाबदार वर्तन केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आमदारांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात कोरोनाच्या मार्गदर्शक नियमांचं उल्लंघन केले जात असताना तेथील पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने टीका करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लय भारी! कोल्ड्रींक्सच्या जागी 'काढा' अन् मास्क लावून कोरोना संसर्ग टाळा; असा रंगला अनोखा विवाहसोहळा
उत्तर प्रदेशातील काशीमध्ये कोरोना नियमावलीचं पालन करून एका अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला आहे. लग्नात आलेल्या पाहुण्याचं स्वागत हे नेहमीप्रमाणे कोल्ड्रींक्स देऊन न करता काढा देऊन करण्यात आले आहे. एवढंच नव्हे, तर लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी भेट म्हणून मास्क दिला आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच पालन करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी दोन लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून डान्स देखील केला आहे. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
काशी येथे राहणारे हरतलाल चौरसिया यांच्या मुलाचा विवाहसोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने कोरोन नियमांचं पालन करून करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रींक्स ऐवजी शरीरासाठी गुणकारी असणारा असा काढा देण्यात आला. तसेच भेट म्हणून मास्कच वाटप करण्यात आलं आहे. हरत लाल चौरसिया यांनी कोरोना संसर्ग लक्षात घेता कोल्ड्रींक्सच्या जागी काढा ठेवण्यात आला होता. तसेच कोणत्याही पाहुण्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती असं म्हटलं आहे.