नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानं सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे १ लाख रुग्ण आढळून आले. काल हा आकडा तब्बल ४ लाखांवर पोहोचला. जगात आतापर्यंत कोणत्याच देशात एकाच दिवसात ४ लाख रुग्णांची नोंद एकाच दिवशी झालेली नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यानं देशातील आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे. कामाचा ताण असह्य झाल्यानं दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरनं आत्महत्या केली.डॉ. विकास राय यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. ते महिनाभरापासून आयसीयूमध्ये कार्यरत होते. ते मूळचे उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचे रहिवासी होते. गेल्या महिनाभरापासून डॉ. राय यांची ड्युटी आयसीयूमध्ये लावण्यात आली होती, असं राय यांच्या सहकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. राय दररोज सात ते आठ रुग्णांना सीपीआर देत होते. मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अनेकजण वाचू शकले नाहीत. या परिस्थितीमुळे राय यांच्यावर ताण आला. त्यांनी ही गोष्ट मनाला खूप लावून घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली.गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून काम करताना डॉ. राय यांनी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले, असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या नोव्हेंबरमध्येच राय विवाह बंधनात अडकले. त्यांची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती आहे. डॉ. राय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवी दिल्लीतल्या एम्समध्ये आणण्यात आला.कोरोना संकटात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर किती ताण आहे हेच या दुर्दैवी घटनेतून अधोरेखित झाल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडेकर यांनी सांगितलं. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे डॉक्टरांवर असलेला मानसिक ताण खूप मोठा आहे. एका तरुण डॉक्टरचा मृत्यू हा संपूर्ण व्यवस्थेनं केलेला खून आहे. कोरोना संकटाशी आघाडीवर राहून दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच आरोग्य सुविधा मिळत नसल्याचं चित्र देशभरात दिसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
CoronaVirus News: रुग्णांना मरताना पाहू शकत नाही! आयसीयूमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 09:04 IST