नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. याच दरम्यान आता दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
दिल्लीतील उच्च न्यायालयात बत्रा रुग्णालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा देण्यात आला होता. मात्र तोपर्यंत उशीर झाला असल्य़ाने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. बत्रा रुग्णालयाने न्यायालयात आमच्याकडे फक्त एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशभाजपामध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे.
लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिलं होतं. आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचं गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. 'लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही' अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे.