नवी दिल्ली: कोरोना विषाणू्चा डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2) आतापर्यंतचं सर्वाधिक संक्रामक रुप मानलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता ही दुसरी लाट ओसरली आहे. मात्र डेल्टानं वाढवलेली चिंता कायम आहे. डेल्टा व्हेरिएंटचे जास्त म्युटेंट व्हर्जन फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. सर्वप्रथम भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन झालं आहे. म्युटेशन होऊन तयार झालेला डेल्टा प्लस अधिक वेगानं फैलावेल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. हा नवा म्युटंट अँटिबॉडी कॉकटेललादेखील निष्प्रभ करू शकतो. यशस्वी प्रयोग! अँटिबॉडी कॉकटेलच्या वापरामुळे 24 तासांत कोरोना लक्षणे गायब
मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल कोरोनाच्या उपचारात सर्वाधिक प्रभावी आहे. मात्र डेल्टा प्लस मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलला पुरून उरू शकतो. ब्रिटिश सरकारच्या आरोग्य आणि सामाजिक देखभाल विभागाची कार्यकारी एजन्सी पब्लिक हेल्थ इंग्लंडनं डेल्टाचे ६३ जिनोम शोधले आहेत. गेल्या शुक्रवारपर्यंत अपडेट करण्यात आलेल्या अहवालात डेल्टा प्लसबद्दल महत्त्वाची माहिती आहे. ७ जूनपर्यंत भारतात डेल्टा प्लसचे ६ रुग्ण आढळून आले असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
डेल्टाचं नवं रुप मोनोक्लोनल अँटिबॉडी औषध कॅसिरिविमाब आणि इम्डेविमाब यांना निष्प्रभ करू शकत असल्याचं पुरावे सापडल्याची माहिती दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे डॉक्टर आणि कम्प्युटेशनल बायोलॉजिस्ट विनोद स्कारिया यांनी दिली. 'विषाणूच्या नव्या रुपाचा भारतात जास्त फैलाव झालेला नाही. आतापर्यंत देशात केवळ सहाच रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा जसजसा विकसित होत होत आहे, तसतसा हा विषाणू अधिक म्युटेट होत आहे,' असं स्कारिया यांनी सांगितलं.