नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरु लागली आहे. एप्रिलमध्ये देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली. गेले अनेक दिवस देशात दररोज ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. मात्र आता एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असताना डेल्टाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यात लस पूर्णपणे प्रभावी असल्याचं आतापर्यंत दिसून आलं होतं. मात्र आता समोर आलेल्या माहितीनं वैद्यकीय क्षेत्रातील सारेच हैराण झाले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनादेखील कोरोनाची लागण होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
कोरोना विषाणूबद्दल जगात सर्वत्र संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून बचाव कसा करायचा याबद्दलचे उपाय शोधून काढले जात आहेत. कोरोना विषाणू विरोधात लस देत असलेली सुरक्षा पुरेशी आहे. त्यामुळे मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे लोकांनी लवकर लस घ्यावी. लस न घेतलेल्यांना कोरोनाचा जास्त धोका आहे, असं १० प्रमुख कोविड तज्ज्ञांनी एका मुलाखतीत सांगितलं.
सर्वप्रथम भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त धोकादायक आहे. हा विषाणू अतिशय वेगानं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. संक्रमणाचा वेग वाढल्यानं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची रोगप्रतिकार क्षमता भेदण्याची क्षमता डेल्टामध्ये आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं.