कोलकाता: कोरोना संकटात डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आघाडीवर राहून लढत आहेत. आतापर्यंत शेकडो डॉक्टरांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मात्र या संकट काळात डॉक्टर्सचा लढा सुरुच आहे. अतिशय तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर रुग्णसेवा करत आहेत. या कालावधीत त्यांना अनेक कडू-गोड अनुभव आले आहेत. कोरोना रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांकडे विविध प्रकारच्या मागण्या करत आहेत.
पश्चिम बंगालमधील काही डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या विविध मागण्यांबद्दल सांगितलं. 'काही नातेवाईक त्यांच्या रुग्णाच्या बेडवर गेट वेल सून लिहायला सांगतात. काही जण रुग्णाच्या वाढदिवशी केक कापण्याची विनंती करतात. एका मुलीला तर तिचे वडील आता जिवंत राहणारच नाही असं वाटलं. तर तिनं त्यांचा एक हसरा फोटो काढून तो मोबाईलवर पाठवण्याची विनंती केली,' असे अनुभव डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टर इंदुदीपा सिन्हा कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. रुग्णालयातील बेड नंबर ३००२ वरील एका रुग्णासोबतचा अनुभव त्यांनी शेअर केला. या बेडवर ८५ वर्षीय सुब्रत सरकार यांना ठेवण्यात आलं होतं. सरकार यांनी ते उपचार घेत असलेल्या रुग्णालयात कधीकाळी काम केलं होतं. त्या रुग्णालयातले ते पहिले भूलतज्ज्ञ असल्याची माहिती त्यांनी डॉ. सिन्हा यांना दिली. विशेष म्हणजे सिन्हा आणि सरकार यांचं शिक्षण एकाच महाविद्यालयात झाल्याचं त्यांना गप्पांदरम्यान समजलं. त्यानंतर सिन्हा यांनी सरकार यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
अपोलो ग्लेनीगल्समध्ये सेवा बजावत असलेल्या डॉ. दीपशिखा घोष काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओ कॉलमुळे चर्चेत आल्या. घोष यांनी त्यांच्या मोबाईलवरून रुग्णाच्या नातेवाईकाला व्हिडीओ कॉल केला होता. त्या नातेवाईकानं किशोर कुमार यांचं 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई' गाणं गायलं होतं.
एका रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केक कापण्याची विनंती केली होती. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र नातेवाईकांनी केक कापण्याचा आग्रह धरला. त्यानंतर डॉक्टरांनी बेडच्या शेजारी केक ठेवला आणि तो कापला. देशभरातील डॉक्टरांना सध्या असे अनुभव येत आहेत.