नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 277 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 4,461 वर पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा आवर्जून सल्ला दिला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी मास्क न लावल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना काँग्रेस आमदाराने अजब दावा केला आहे.
मास्क वापरणं हे आरोग्यासाठी त्रासदायक असून मास्कचा जास्त वापर करू नये असं काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे. तसेच कोरोना चाचणीचाही काही उपयोग नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. झारखंडचे काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी मास्क लावला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना यावर प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी कोरोनाबाबत अजब प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्याकडे मास्क आहे. पण आपण जास्त वेळ मास्क लावता कामा नये. मी एक आमदार म्हणून नाही, तर एमबीबीएस डॉक्टर म्हणून सांगतोय. जास्त वेळ मास्क लावू नका. गर्दीच्या ठिकाणी फक्त मास्क घाला" असं म्हटलं आहे.
"चाचणी करा, पॉझिटिव्ह येईल. परत करा, निगेटिव्ह येईल"
"तुम्ही श्वास घेत आहात, कार्बन डायऑक्साईड सोडताय, पुन्हा तोच नाकावाटे आत घेताय.. काय चाललंय हे?" असा प्रश्न देखील आमदारांनी उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचंही फार टेन्शन न घेण्याचा सल्ला आमदार इरफान अन्सारी यांनी दिला आहे. "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे फार घाबरून जायचं कारण नाही. मी वारंवार सांगतो आहे. आम्ही देखील बघतो आहोत. आमचे कुटुंबीय देखील आजारी होते. आज तुम्ही चाचणी करा, पॉझिटिव्ह येईल. परत करा, निगेटिव्ह येईल. त्याची काय किंमत आहे?" असाही सवाल अन्सारी यांनी केला आहे.
"इन्फेक्शन दोन-तीन दिवसांत संपून जाईल, पॅरासिटॅमॉल खा, अँटिबायोटिक खा"
"जर तुम्ही आरटीपीसीआर करताय, त्याचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला, तर ते इन्फेक्शन दोन-तीन दिवसांत संपून जाईल. पॅरासिटॅमॉल खा, अँटिबायोटिक खा" असा अजब सल्ला अन्सारी यांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. काही राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.