नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. डॉक्टर्स, नर्ससह आरोग्य क्षेत्रातील सर्वच कर्मचारी हे अहोरात्र काम करत असून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर काही ठिकाणी नातेवाईक डॉक्टरांवरच संताप व्यक्त करताना दिसत आहे. देशातील विविध भागांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये डॉक्टरांवर हल्ला होण्याचे आणि रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच एक प्रकार आसाममध्ये घडला आहे.
जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांवरच जीवघेणे हल्ले होत आहेत. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर काही लोकांनी डॉक्टरलाच बेदम मारहाण केल्याची एक भयंकर घटना समोर आली आहे, या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आसामसच्या होजईमध्ये ही घटना घडली आहे. काही लोकांनी डॉक्टर सेजू यांना घरातून ओढत बाहेर आणलं आणि त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर गंभीर अवस्थेतील या डॉक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यात अपयशी ठरल्यामुळे डॉक्टरला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी या घटनेचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सवर होणारे हे गंभीर हल्ले प्रशासन सहन करणार नाही. त्यांनी याबाबत आसामसचे स्पेशल डीजीपी जी पी सिंह आणि आसाम पोलिसांना निर्देश देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तब्बल 594 डॉक्टर्सचा बळी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association -IMA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 594 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या डॉक्टरांपैकी सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील आहेत. आयएमएकडून राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला असून यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 1300 डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचं आयएमएने सांगितलं आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे.