जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 49 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,176,553 लोकांचा बळी गेला आहे. तर 491,858,699 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 426,858,976 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. आता हातांच्या बोटांवरून कळणार कोरोनाचा कितपत धोका आहे. रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञांनी एक रिसर्च केला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, एखाद्या व्यक्तीची नखं पाहून देखील एखाद्या व्यक्तीला कोरोना होण्याचा धोका किती आहे हे कळते. यासोबतच नखांबरोबर एखाद्या व्यक्तीच्या बोटांवरून त्याला कोरोनाचा किती धोका आहे हे कळू शकतं.
मीडिया रिपोर्ट्स आणि रिसर्चनुसार, ज्या लोकांची अनामिका (Ring Finger) तर्जनीपेक्षा (Index Finger) लहान आहे त्यांना गंभीर कोरोनाचा धोका जास्त असू शकतो. तज्ञांच्या मते, पोलंडमधील लॉड्झ मेडिकल युनिव्हर्सिटी आणि स्वीडनमधील कॅरोलिंस्का युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील संशोधकांच्या टीमने कोविड-19 ची लागण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या हार्मोन पातळीचा बरे होण्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी एक रिसर्च केला. छोटी अनामिका असलेल्या लोकांना कोरोनामुळे लवकरच रुग्णालयात दाखल करावे लागते असं देखील म्हटलं आहे.
ज्या लोकांच्या उजव्या आणि डाव्या हाताच्या बोटांमध्ये फरक आहे त्यांच्यामध्येही व्हायरसची गंभीर लक्षणे आढळून आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल चार कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (4 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 913 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5,21,358 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे.