नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांचा आकडा हा तब्बल 2 कोटींवर गेला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागून करण्यात आले आहे. देशभरातील पोलीस यंत्रणा गेल्या वर्षभरापासून कोरोनाकाळात लोकांना कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करत आहे. पोलीस देखील कोरोनाच्या संकटात आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून सेवा करत आहेत. कोरोना नियमावलीचं पालन न करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आपल्या आजारी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांकडून पोलिसांनी दंड आकारल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीवर निर्बंधादरम्यान बाहेर पडल्यामुळे कारवाई केली आहे. पत्नीसोबत आपल्या 4 महिन्यांच्या मुलाला घेऊन रुग्णालयात घेऊन गेलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून दंड वसूल केला आहे. फिरोजाबाद येथील रहिवासी राजू कुशवाह हे मंगळवारी रात्री बाईकने आपल्या 4 महिन्यांच्या आजारी बाळाला घेऊन डॉक्टरकडे गेले होते. त्यांच्यासोबत यावेळी त्यांची पत्नी राधा देखील होती.
डॉक्टरकडे जात असताना रस्त्यातच पोलीस चेकिंग सुरू असल्याने त्यांना थांबवण्यात आले. पोलीस निरीक्षक वीरेंद्रसिंग धामा यांनी त्यांची बाईक थांबवली आणि "कोरोना कर्फ्यू" चे उल्लंघन केल्याचे सांगत एक हजार रुपयांचा दंड आकारला आहे. राजू यांनी आपल्या चार महिन्यांच्या मुलाची प्रकृती ठीक नाही आणि त्यामुळे डॉक्टरकडे घेऊन जात असल्याचं पोलीस निरीक्षकांना सांगितलं. मात्र त्यांनी राजूची कोणतीही गोष्ट ऐकण्यास नकार दिला आणि दंड वसूल केला. त्यानंतर स्थानिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या घटनेची स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.
आजारी चिमुकल्याला डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या पित्याकडून पोलिसांनी दंड आकारल्याने पोलिसांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. तसेच या प्रकरणी पोलिस अधीक्षक मुकेश कुमार मिश्रा यांनी आवश्यक कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र तरी देखील देशातील काही राज्यांमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.