नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३२ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले असून, इतकी विक्रमी वाढ प्रथमच झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ लाख ६८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तसेच गुरुवारी २० हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्ण बरे झाले आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण ६३.२४ टक्के झाले असून तेदेखील आजवरचे सर्वांत जास्त प्रमाण आहे.देशभरात कोरोनाच्या आजारातून ६,१२,८१४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या ३,३१,१४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी कोरोनामुळे आणखी ६०६ लोक मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या २४, ९१५ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवसात कोरोनाचे ३२,६९५ नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण व बळींची संख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९, ६८,८७६ झाली आहे.कोरोनामुळे आणखी ६०६ जणांचा बळी गेला असून, त्यात महाराष्ट्रातील २३३, कर्नाटकमधील ८६, तमिळनाडूतील ६८, आंध्र प्रदेशमधील ४४, दिल्लीतील ४१, उत्तर प्रदेशमधील २९, पश्चिम बंगालमधील २०, जम्मू-काश्मीर व तेलंगणामधील प्रत्येकी ११ व गुजरातमधील १० व मध्य प्रदेशमधील ९ जणांचा समावेश आहे.
CoronaVirus News : देशात प्रथमच दिवसभरात ३२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 1:05 AM